संजय मानाजी कदम
आपली ओळख निर्माण करणं हे आजच्या युगात खरं तर सोपं नाहीच. संघर्ष आणि आव्हानांचा यशस्वी मुकाबला करुनच राजकारणासारख्या क्षेत्रात उभं राहता येतं. १५ जानेवारी १९७५ ह्या दिवशी सातारा जिल्ह्यातील खरोसेवाडी येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय मानाजी कदम यांनाही ह्याचा सामना करावा लागला. पाच बहिणी आणि एक भाऊ तसेच आई-वडील अशा मोठ्या परिवारात जन्मलेल्या संजय कदमांना कठीण परिस्थितीवर मात करुन स्वतःचा मार्ग निवडावा लागला.
१५ वर्षे वय हे फार काही समज असण्याचे नाहीच, परंतु याच वयात संजय कदम यांचं भविष्याबद्दलचं स्पष्ट चित्र ठरलं होतं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होत, सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी समाजकारण करण्याचा निर्णय घेतला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा विचार मुळातच समाजसेवेची ओढ असलेल्या संजय कदम यांना आवडणारा होता आणि त्यामुळेच त्यांनी शिवसेनेत काम करायला सुरु केलं.
बाळासाहेबांनी मुंबईत शिवसेनेची मूळं पोहचवली, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्काचा लढा लढला, सर्वसामान्य माणसावरील अन्याय दूर करण्याचं जे आंदोलन उभं केलं त्यात शिवसेनेच्या शाखाप्रमुखांची भूमिका महत्वाची होती, तेच ‘शाखाप्रमुख’पद संजय कदम यांनी २००७ ते २०१८ अशी अकरा वर्षे भूषवलं. शाखाप्रमुखपदाच्या माध्यमातून दांडग्या जनसंपर्काद्वारे लोकांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासाच्या बळावर २०१८ साली विधानसभेतील जनतेसाठी काम करण्याची संधी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सोपवली व सात शाखांचा समावेश असलेल्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या ‘विधानसभा संघटकपदी’ नियुक्ती केली.
काम करणारी माणसं ही पक्षनेतृत्वाला हवी असतात आणि योग्यवेळी त्यांच्यावर योग्य जबाबदारी टाकली जाते ते नेहमीच संजय कदम यांच्याबाबत घडून आली आहे. २०२४ ची लोकसभा ही शिवसेनेसाठीच नाही तर देशासाठी महत्वाची आणि निर्णायक निवडणूक होती आणि त्याची तयारी ही काही वर्षे आधीच सुरु झाली होती त्याप्रमाणे रायगडसारख्या प्रमुख जिल्हाची जबाबदारी संजय कदम यांच्या खाद्यावर टाकण्यात आली. तळागाळातील शिवसैनिकांशी संपर्क शिवसेना पक्ष दक्षिण रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गाव-खेड्यात वाढवण्याचं काम यावेळी संजय कदम यांनी केले. त्यासाठी ‘गाव तिथे भगवा’, ‘गाव संपर्क मोहीम’ तसेच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नव्याने शिवसेनेशी जोडल्या गेलेल्या जनतेशी ‘मोहल्ला संपर्क अभियान’ असे कार्यक्रम आखून शिवसेनेची घोडदौड सुरु ठेवली. पुढे हेच काम सुरु ठेवण्यासाठी उद्धवसाहेबांनी संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय कदमांवर सोपवून शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत गीते यांच्या निवडणूकीची पक्षाची प्रमुख जबाबदारी सोपवली.
समाजात सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या संजय कदम यांनी शाखाप्रमुख, तालुकासंपर्कप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख ते लोकसभा निवडणूक समन्वयक अशा शिवसेना पक्षातील महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत, तळागाळातील शिवसैनिकांची मोट बांधली. पक्षाच्या पदाधिकारी आणि नेतृत्वाशी समन्वय साधत पक्षासाठी आवश्यक त्या मोहिमा राबवल्या.
समाजातील तळागाळाती जनता असेल किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील संजय कदम यांच्या मदत करण्यासाच्या गुणवैशिष्ट्यांमुळे ते सामान्यांचे लाडके नेतृत्व बनले आहेत.